Thursday, September 4, 2008

यूएस ओपनमध्ये लिअँडर पेस-ब्लॅक अजिंक्य

मटा ऑनलाइन वृत्त, न्यूयॉर्क

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा लिअँडर पेस आणि झिम्बाब्वेची कारा ब्लॅक या जोडीने मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद जिंकून नवा इतिहास घडला. विशेष म्हणजे पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यातही पेस-ल्युकास लॉही जोडीने अंतिम फेरीत धडक मारली असून, ग्रॅड स्लॅम स्पर्धेत नऊ वर्षांनंतर दुहेरी मुकुटाचा मान संपादण्याची संधी पेसला मिळणार आहे.

यूएस ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पेस-कारा ब्लॅक जोडीने ब्रिटनचा जॅमी मूर आणि अमेरिकेची लायझल हुबेर या जोडीचा ७-६, ६-४ असा पराभव करुन जेतेपदावर आपले नाव कोरले. १९९९ मध्ये पेसने अमेरिकस लिसा रेमंडसह फ्रेंच ओपन व विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. तर २००३ मध्ये मार्टिना नवरातिलोवाच्या जोडीने विम्बल्डन व ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदावर कब्जा केला होता. आता पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात पेस-ल्युकास लॉही जोडीचा सामना अमेरिकेच्या माइक आणि बॉब ब्रायन बंधूंशी शुक्रवारी रंगणार आहे.

अमेरिकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत पेसने ल्युकास लॉहीच्या साथीने अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोंझालेझ-ज्युआन मोनॅको यांचा पाऊण तासातच ६-२, ६-० असा फडशा पाडला. 'यंदाची अमेरिकन स्पर्धा 'स्पेशल' असेल असे वाटत होते आणि माझा अंदाज खरा ठरला. आता वय वाढले असले तरी मनाने तरूणच आहे. वयाबरोबरच अनुभव गाठीशी आल्याने खेळात परिपक्वता आली आहे', असे पेसने सांगितले.

दुहेरीचा सामना ४६ मिनिटांतच आटोपल्याने पेस-लॉही खूष आहेत. 'माझ्या कारकिदीर्तील हा सर्वात जलद सामना, आम्हाला चेंडू कलिंगडाप्रमाणे भासत होता', असे पेस म्हणाला.

मंगळवारी दुहेरी व मिश्रचे उपांत्य सामने लागोपाठ खेळल्याने ३५ वर्षीय पेसची दमछाक झाली होती. मिश्र व दुहेरीच्या अंतिम लढतीआधी एका दिवसाची विश्रांती मिळाल्याने पेस सुखावलाय. आपला साथीदार लॉहीचे कौतुक करताना तो म्हणाला, 'आमची जोडी छान जमली आहे. लॉही माझ्यासारखाच टेनिसवेडा आणि मेहनती असल्यामुळे प्रत्येक स्पर्धेगणिक आमची कामगिरी उंचावतेय'.

ग्रँडस्लॅम अजिंक्यपदापेक्षा ऑलिंपिक ब्राँझ पेसला मोलाचे वाटते. 'ऑलिंपिक पदकाची शान औरच! पदक एकेरीतील असेल, तर क्या कहना', असे तो सांगतो.

No comments: