Thursday, September 4, 2008

ब्युटी ऑफ रणथंबोर

या मछलीने एका मगरीला मारलं. खरं म्हणजे मगर ही वाघाचं नेहमीचं भक्ष नाही. आणि मगरीची शिकार वाघासाठी खूपच धोकादायक असते. मछलीने या शिकारीत आपल्या चारांपैकी दोन स्तन गमावले. हे बछडे तिच्याबरोबर ऑक्टोबर २००६ पर्यंत राहत होते. दोन आचळं गमावलेली वाघिण जिवंत कशी राहिली व तिने आपल्या पिल्लांना या स्थितीत कसं वाढवलं, हा प्रश्न या क्षेत्रातल्या सगळ्याच अभ्यासकांना पडला.

.........

' मछली' हे नाव कुठल्या माशाचं नसून रणथंबोर नॅशनल पार्क मधल्या एका वाघिणीचं आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे नाव तिला दिलंय. बी.बी.सी.च्या फिल्मिंग टिमनं. ही वाघिण आता सहज अकरा वर्षांची असेल. मछली ही रणथंबोरमधल्या किल्ल्यातली रहिवासी असून हा भाग या नॅशनल पार्कातला सगळ्यात निसर्गसंपन्न असा आहे. पार्कातल्या सहा तलावांपैकी किल्ल्याच्या परिसरात तीन तलाव आहेत.

मछली ही बहुतेक जगातली सगळ्यात जास्त फोटोग्राफ काढलेली वाघिण असावी, जसा भारतातला ताजमहाल. तिचा जन्म १९९७ च्या पावसाळ्यात इथेच झाला. इलारा नावाच्या वाघिणीला झालेल्या तीन पिल्लांमध्ये लहान असल्यापासूनच मछलीच सगळ्यात आक्रमक होती. खरं म्हणजे लहान असल्यापासून निष्णात शिकाऱ्याचे सगळे गुण तिच्यात पूर्णपणे दिसत होते.

२००० च्या उन्हाळ्यात बांबूराम नावाच्या अतिशय देखण्या व आक्रमक वाघापासून मछली पहिल्यांदा गरोदर राहिली. अमेरिकेचे प्रेसिडेण्ट बिल क्लिंटन यांनी नोव्हेंबर २००१ च्या रणथंबोरच्या भेटीत याच वाघाला पाहिलेलं होतं. मछलीला या खेपेस दोन बछडे झाले. पहिल्याचं नाव 'ब्रोकन टेल' तर दुसऱ्याचं 'स्लांट इअर'. दोन्ही बछडे डिसेंबर २००१ मध्ये आईपासून स्वतंत्र झाले. मछलीने एप्रिल २००२ मध्ये परत तीन पिल्लांना जन्म दिला. यातलं एक पिल्लू लगेचच मरण पावलं. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर २००२ मध्ये पार्क परत उघडल्यावर लोकांनी तिला आपल्या दोन पिल्लांबरोबर फिरताना बघितली. यातला एक नर व एक मादी होती.

२००५ च्या उन्हाळ्यात मछलीने परत दोन बछड्यांना जन्म दिला. रणथंबोर मधला तो उन्हाळा भयंकर होता. या मछलीने एका मगरीला मारलं. खरं म्हणजे मगर ही वाघाचं नेहमीचं भक्ष नाही. आणि मगरीची शिकार वाघासाठी खूपच धोकादायक असते. मछलीने या शिकारीत आपल्या चारांपैकी दोन स्तन गमावले. हे बछडे तिच्याबरोबर ऑक्टोबर २००६ पर्यंत राहत होते. दोन आचळं गमावलेली वाघिण जिवंत कशी राहिली व तिने आपल्या पिल्लांना या स्थितीत कसं वाढवलं, हा प्रश्न या क्षेत्रातल्या सगळ्याच अभ्यासकांना पडला. पण मछलीने यशस्वीपणे आपल्या पिल्लांना वाढवलं, ही वस्तुस्थिती होती. ऑक्टोबर २००६ मध्ये तर मछलीने तीन मादी पिल्लांना जन्म देऊन थक्क केलं. कारण वाघांमध्ये असं क्वचितचं होतं.

मी पहिल्यांदा मछलीला बघितलं ते मे २००१ मध्ये. त्या वेळी आम्ही पार्कातल्या नालाघाटी भागात जिप्सीमधून फिरत होतो. जंगलातला हा रस्ता अगदी अरुंद होता व ती समोरून आमच्याच दिशेने येत होती. त्या वेळी तिथे पाच-सहा जिप्सी होत्या. मछली डाव्या बाजूने समोरूच येत असल्याने सगळ्याच गाड्या रिव्हर्स जाण्याच्या तयारीत होत्या. मी ड्रायव्हरला इंजिन बंद करून गाडी डावीकडेच ठेवायला सांगितलं. कारण उजवीकडून तिला जायला तीन एक फूट रुंदीचा रस्ता होता. आम्ही थांबलो होतो त्याच्या डाव्या बाजूला पन्नासएक फूट दरी होती. वाघिण आमच्या जीपला कडेने गेली. आम्ही तिघे जीपमध्ये उभे होतो. तिने आम्हाला चांगलीच नजर दिली. त्या वेळचा प्रसंग खरं म्हणजे वर्णनापलीकडचा आहे. विचार करा की मछली सारख्या उमद्या वाघिणीशी नजरानजर. तीही तीन चार फूट एवढ्या जवळून... कुठल्याही क्षणी तिने जीपमध्ये उडी मारली असती... आता तो क्षण आठवला तरी कापरं भरतं. पण मछली शांतपणे आमच्या बाजूने गेली. त्या वेळी तिच्याबरोबर तिचे दोन बछडेही होते. त्यानंतर यावर्षीच्या मे महिन्यात, म्हणजे सात वर्षांनी मी परत रथणंबोरला माझ्या कर्नल मित्राबरोबर गेलो. काय विलक्षण योगायोग पहा. पहिल्याच दिवशीच्या त्याच नालाघाटी भागात संध्याकाळच्या फेरीत मला मछली तिच्या तीन मादी पिल्लांसह भेटली. तिच्या या प्रतिकृती चांगल्याच भरदार होत्या. त्यातली एक तर मछलीहून मोठी वाटली. माझ्यासाठी तो उत्कट भावनेचा क्षण होता. आपल्या परिचयाचं माणूस बऱ्याच काळाने अचानक आपल्याला भेटलं की, जसं वाटेल तसंच माझं झालं. ती जणू काही मला भेटायला सात वर्ष वाट बघत होती. गेल्या वेळी तिला मी तिच्या दोन बछड्यांसह बघितलं होतं आणि या वेळी तिच्या तीन मुलींसह. या वेळी आम्ही तब्बल सात दिवस इथे तळ ठोकून होतो. या मुक्कामात मी वाघांचे जवळपास पंधराशे फोटो काढले.

सोबतचा फोटो मछली जांभई देतानाचा आहे. तुम्ही जर हा फोटो नीट बघितलात तर तुमच्या लक्षात येईल चार पैकी तिने तीन सुळे गमावलेले आहेत. आता मी विचार करतोय की मछली आपली शिकार एका सुळ्याच्या मदतीने कशी काय करेल? पण तरीही मी यावषीर् तिला सांबरावर हल्ला करताना बघितलंय. तिच्यात अजूनही पूवीर्ची उमेद आणि क्षमता शाबूत आहे. आणि मला चांगलचं माहीत आहे की ती सामान्य नसून ब्युटी ऑफ रणथंबोर आहे. मला नक्की विश्वास आहे, की माझ्या रणथंबोरच्या पुढच्या भेटीतही मछली मला त्याच स्नेहाने भेटेल.

No comments: